शक्ती दुबे देशात अव्वल   

यूपीएससी निकाल

महाराष्ट्राचा अर्चित डोंगरे तिसरा 

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा, २०२४ चा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर केला. या परीक्षेत प्रयागराज येथील शक्ती दुबे हिने देशात अव्वल स्थान पटकावले आहे. हरयानाच्या हर्षिता गोयल हिने दुसरा क्रमांक मिळविला. तर, महाराष्ट्रातील पुण्याचा अर्चित पराग डोंगरे याने तिसरा क्रमांक मिळविला.
 
देशात आघाडीच्या २५ उमेदवारांमध्ये ११ महिला आणि १४ पुरुषांचा समावेश आहे.शक्ती दुबे मध्यमवर्गीय कुटुंबातील असून तिने अलाहाबाद विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी घेतली आहे. हर्षिता हिने बडोद्याच्या एमएस विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे.अर्चित याने व्हीआयटी, वेल्लोर येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये बीटेक शिक्षण घेतले आहे. अर्चित मुळचा पुण्याचा असून त्याचे शालेय शिक्षण मुंबईत झाले.शाह मार्गी चिराग हिने चौथा आणि आकाश गर्गने पाचवा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या पाच यशस्वीतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे.
 
नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा २०२४ गेल्या वर्षी १६ जून रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण ९,९२,५९९ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी, ५,८३,२१३ उमेदवार परीक्षेला बसले होते.सप्टेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या लेखी (मुख्य) परीक्षेसाठी एकूण १४,६२७ उमेदवार पात्र ठरले. यापैकी २,८४५ उमेदवार ७ जानेवारी ते १७ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या व्यक्तिमत्व चाचणी किंवा मुलाखतीसाठी पात्र ठरले होते.
 
यूपीएससीने २०२४ च्या परीक्षेसाठी आयएएस, आयपीएससह एकूण १,१३२ पदांसाठी भरती जाहीर केली होती. यामध्ये १,००९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यात ७२५ पुरुष उमेदवार आणि २८४ महिला उमेदवारांचा समावेश आहे.यशस्वी उमेदवारांपैकी ३३५ सर्वसाधारण प्रवर्गातील, १०९ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, ३१८ इतर मागासवर्गीय, १६० अनुसूचित जाती आणि ८७ अनुसूचित जमातीतील आहेत, असे आयोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 
 

Related Articles